भडगाव । जळगाव जिल्ह्यातील गुढे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवाशी असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला कर्तव्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये वीरमरण आलं आहे. स्वप्नील सुभाष सोनवणे (३९) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पार्थिव सैनिकी सन्मानाने मूळ गावी गुढे (ता. भडगाव, जि. जळगाव) रवाना करण्यात आले आहे.
स्वप्नील सोनवणे हे २०१४ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. सोनवणे हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगालमध्ये जी.डी. कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. ते बांगलादेशच्या सीमेवरील सीमा फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्त करण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून काँक्रिट बेसवर पडले. त्यांना तत्काळ बीएसएफ रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यासह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
जवान सोनवणे यांचे पार्थिव घेऊन सीमा सुरक्षा दलाचे जवान विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहोचतील. त्यानंतर उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता गुढे येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. या संदर्भात जळगाव येथील पोलीस प्रशासनाला सीमा सुरक्षा दलाने माहिती दिली आहे. त्यांचे कुटुंब सध्या चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे.
Discussion about this post