सोमपूर । सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ दुधाच्या टँकरने शाळकरी विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली असून या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
श्रेया सुरेश पाञे असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून श्रद्धा श्रीकांत कांबळे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असून बुधवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या.
याचवेळी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ भरधाव वेगात आलेल्या दुधाच्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. तर श्रद्धा गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं. रस्ता खराब असल्याने असे भयंकर अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. रस्ता दुरुस्तीबाबत ठोस आश्वासन देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून याप्रकरणी पोलिसांकडून टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post