जळगाव । यावल, रावेर तालुक्यातील सहा जणांना प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आले आहे. या तीन जणांना सहा महिन्यासाठी तर दुसऱ्या तीन जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सार्वजनिक सण, उत्सव व निवडणूक शांततेत पार पाडाव्या व शहरात शांतता अबाधित रावी, यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये उपद्रवींचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आलेले होते.
समाजामध्ये दमदाटी करणारे, शासकीय कामात अडथळा आणणारे, गैर कायद्याची मंडळी जमवून धमकावणे अशा उपद्रवी लोकांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यावर सुनावणी होऊन त्यांना जिल्ह्यातून प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्या आदेशान्वये हद्दपार पार करण्यात आले आहे.
यामध्ये सुमित युवराज घारू यावल, शेख मुस्तफा उर्फ टिंग्या शेख इसाक रसलपूर, शेख हुसेन शेख हसन रसलपूर यांना सहा महिन्यांसाठी तर अशोक गोवर्धन तायडे अट्रावल, मोहन दशरथ बोखे पातोंडी, संदीप आधार सोळंके कोळ न्हावी यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय यांनी प्रवेश करू नये, असे आदेश प्रांताधिकारी देवयानी यादव यांनी दिले आहेत.