मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरी सुद्धा राज्यात नव्या सरकारचा शपथविधी पार पडला नाहीय. यातच उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्रिपदापासून ते मंत्रिपदांच्या वाटपापर्यंत अजूनही बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसून, ते भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झाल्यापासून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन सुषमा अंधारे यांनी एक ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे.
महायुतीमध्ये आता मुख्यमंत्रिपदानंतर गृहमंत्रिपदावरुनही रस्सीखेंच सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुन संजय राऊत हे वारंवार महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहेत. यावरुन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्याला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.
आ. गुलाब पाटील ज्याअर्थी म्हणताहेत की @rautsanjay61 साहेब आगीत तेल टाकत आहेत. याचाच दुसरा अर्थ,"रान पेटलंय" हे गुलाब पाटील मान्य करतात..!!
गुलाबराव 5तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरतगुवाहाटी केलं तेच EDचा दोरखंड सुद्धा आवळू शकतात. @PTI_News pic.twitter.com/TemOcpsrmS— SushmaTai Andhare (@andharesushama) December 3, 2024
“EVM च्या कृपेने यश आणि त्या बहुमतानंतर सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली रस्सीखेंच आणि अगदी साम-दाम-दंडभेद आणि भावनिक दबाव हे फंड शिंदे वापरत आहेत. या फंड्यावर संजय राऊत यांनी अत्यंत सटीक विश्लेषण केलं. यावर गुलाबराव पाटील म्हणतायत की ते आगीत तेल टाकत आहेत. गुलाबराव… चला मान्य करु आगीत तेल टाकलंय.. म्हणजे तुम्ही हे मान्य केलं की आग लागली आहे, रान पेटलं आहे. ही आग आता 5 तारखेपूर्वी काहीही करुन ती आग विझवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्ही ज्यांच्या जीवावर सुरत, गुवाहाटी फिरायला गेला होतात, तेच लोक तुमच्या गळ्याभोवती ED चा दोरखंड आवळताना जराही मागे कचरणार नाहीत. बाकी नाही बहीण म्हणून काळजी वाटली… तुमचं तुम्ही ठरवा.”
Discussion about this post