अयोध्या । संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं. अखंड भारत ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानं अनुभवला. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील उपस्थिती होती.
आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कोट्यवधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते.
मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक झाले होते. दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.
Discussion about this post