मुंबई : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत असून यासाठी निमंत्रण फार मोजक्या लोकांना दिलं जात आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण आलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.
मात्र याबाबत शरद पवार यांनी स्वत: प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. “अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहेय मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
‘अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ’
“अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. 10 हजारांचे तिकीट 40 हजार रुपये करण्यात आले आहे. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील”, असं शरद पवार म्हणाले. “राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचे काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील”, असं शरद पवार म्हणाले.
Discussion about this post