जळगाव : जळगाव शहरातील गंधर्व कॉलनीत राहत असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. सौरभ विकास कोल्हे (वय २३) असं मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही
सौरभ कोल्हे मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथील रहिवासी आहे. सौरभचे आई-वडील शेतकरी असून मध्यप्रदेशातील दाभियाखेडा येथे राहून ते शेती करतात. सौरभ शिक्षणासाठी जळगावातील गंधर्व कॉलनीत एका भाडेकरारावरील खोलीत वास्तव्यास होता. वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर तो एमबीए करणार असल्याने जळगावात आला होता. पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता.
गुरुवारी संध्याकाळी सर्व मित्र खोलीबाहेर बसलेले असताना सौरभ आत गेला व मागील खोलीमध्ये त्याने गळफास घेतला. रात्री साडेनऊ वाजता त्याचे मित्र जेवणासाठी त्याला बोलवण्यासाठी गेले असता त्यांना सौरभ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सौरभला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या मित्रांना मोठा धक्का बसला.
सौरभ हा नियमित अभ्यास करायचा व कोणत्याही तणावात नव्हता. तरी देखील त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न सौरभच्या मित्र व नातेवाईकांना देखील पडला आहे. मयत सौरभच्या पश्चात आई – वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालय गाठले आणि आक्रोश केला.















Discussion about this post