नाशिक । भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत असून पोलिस तपासात गंभीर बाबी उघड होत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखालील आरोपी अशोक खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.
या सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात महत्त्वाची कागदपत्रे आणि एक लॅपटॉप सादर केला. आरोपी महिलांवर अत्याचार करताना लॅपटॉप समोर ठेवून व्हिडिओ चित्रित करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सात महिन्यांच्या गर्भवती महिलेलाही त्याने सोडले नसल्याची अत्यंत धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायमूर्ती बी. एन. इचपुराणिक यांच्या समोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील, तपास अधिकारी आणि आरोपीचे वकील न्यायालयात उपस्थित होते.
तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी महिलांना “विशिष्ट विधी” करण्याच्या नावाखाली गुंगीचे औषध देत अत्याचार करत होता. तसेच बाजारातील साधे चिंचोके पॉलिश करून लाखो रुपयांना विकल्याचेही उघड झाले आहे. विधीच्या नावाखाली नकली साप, नाग आणि वाघाचे कातडे दाखवून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, हे नकली साप, नाग आणि वाघाचे कातडे आरोपीने कुठून आणले, तसेच नकली खडे कोणाकडून घेतले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी अत्यंत हुशार आणि चाणाक्ष असून तपासात सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी न्यायालयात नमूद केले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आगामी तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.















Discussion about this post