धुळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे अवैधरित्या गर्भपात सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेचा गर्भपात देखील करण्यात आला असून मुलीचे अर्भक देखील पथकाला आढळून आले आहे.
सुमन हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे गर्भपात सुरू असल्याची तक्रार ‘आमची मुलगी’ या वेबसाईटवर प्राप्त झाली होती. त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली. या धाडीमध्ये पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचे आढळून आले आहे. सुरत येथे गर्भलिंग निदान करून आल्यानंतर या ठिकाणी गर्भपात होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सुमन हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येणार असून याप्रकरणी डॉ. सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत एका नर्सला देखील ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी यांनी दिली.
Discussion about this post