मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहे. या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात आले. यामुळे शिवसेनेमध्ये गेल्या वर्षभरापासून विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे ‘इनकमिंग’ सुरू असताना अशातच आता पहिल्यांदाच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादी पुढे आली आहे.
कांदिवली, चारकोप आणि मालाडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे पाठवण्याबाबत पत्र पाठवले आहे.
या पदाधिकाऱ्यांनी पत्रात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार सिद्धेश यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ते पक्षात काम करू देत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्यांची संख्या ही तब्बल ३० ते ४० इतकी आहे. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या’, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
Discussion about this post