जळगाव । जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होत असून या निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार बाजी मारली आहे. अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट व भाजपचे उमेदवार निवडून आले. दरम्यान जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाने खाते ओपन केलं आहे.
यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांनी निर्णायक विजय मिळविला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची विजयी माळ गळ्यात घातली आहे.
निकालानुसार उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी एकूण १४ हजार ५० मते मिळवली, तर भाजपच्या सौ. रोहिणी उमाकांत फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांहून कमी मते मिळाली. या मोठ्या मताधिक्यामुळे छाया पाटील यांचा विजय दणदणीत ठरला असून, त्यांनी यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.
विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावल शहरात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.















Discussion about this post