मुंबई । एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असून काही पक्षांमध्ये नाराजीनाट्य समोर येत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठवला आहे. शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे राजीनामा दिल्यानांतर शिंदे यांनाच खडेबोल सुनावले आहे.
‘शिंदेसाहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे संपर्कप्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा.’ असे खडेबोल बाजीराव दराडे यांनी शिंदे यांना सुनावले आहेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी ४ महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान विश्वासात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे नाराज होते. त्यातच मेंगाळ यांनी पक्ष प्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिगेला पोहचला होता.
मारुती मेंगाळ यांनी आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मारुती मेंगाळ यांनी ‘एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा’, अशी मागणी भर मंचावर एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यावेळी जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्यांना खोडा घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केले जाईल.’ असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर बाजीराव दराडे यांनी स्वतःहून आपला राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे.















Discussion about this post