शिंदखेडा । राज्यात जबरी चोरी, दरोड्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत असून अशामध्येच शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे भर वस्तीत दिवसा पिस्तूलचा धाक दाखवून सराफ पेढी लुटण्याचा प्रयत्न झाला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला. या वेळी हवेत गोळीबार करून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून नरडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. आनंदा गोरख पाटील (रा. मालेगाव, जि. नाशिक) व सूरज सुभाष मोहिते (रा. मातोरी जि. नाशिक) अशी संशयित आरोपींची नावे आहे.
दरम्यान, या घटनेमुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यातील बेटावद गावातील मुख्य रस्त्यावर भर वस्तीत बालाजी मंदिराजवळ दिलीप उत्तमचंद चोरडिया यांचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी दिलीप चोरडिया यांच्याकडे सोन्याच्या अंगठीची मागणी केली. चोरडिया यांनी सोन्याची अंगठी नसल्याचे सांगून पुढील दुकानात तपास करा असे सांगितले.
त्यावर दोघांनी दिलीप चोरडिया यांना धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले. या वेळी चोरडिया यांनी आरडाओरड केल्याने दोघांपैकी एकाने त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांच्या घरात काम करत असलेला कर्मचारी रमेश घावत खाली आला. या वेळी दुसऱ्या चोरट्याने रमेशला पकडून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दोघांची आरडाओरड ऐकून ग्रामस्थ जमा झाले. या वेळी दोघे दोघे चोरटे मोटारसायकलने ( एमएच १८, बीएम ७७८३) पळण्याचा प्रयत्नात होते. ग्रामस्थ पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून दोघांनी मोटारसायकल सोडून पळण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत हवेत गोळीबार केला. त्यानंतरही ग्रामस्थांनी हिमतीने चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
Discussion about this post