जळगाव । एकीकडे भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराला प्रशासन-पोलिसांवर भरोसा नसल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचं दिसून आलं आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात राजकीय चर्चा जोरात रंगली आहे.
भडगाव आणि पाचोरा या दोन्ही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार सामना रंगलेला आहे. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आता हा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र ईव्हीएमसोबत छेडछाड केला जाईल असा आरोप महाविकासआघाडी करत असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली.
खासगी सुरक्षा रक्षकांची तैनात आता राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा ठरत आहे. अधिकृत चोख पोलिस बंदोबस्त असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमल्याने ईव्हीएम सुरक्षिततेबाबत नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.स्ट्राँग रुम बाहेर नेमलेले सुरक्षारक्षक इथल्या परिसरावर करडी नजर ठेवत आहेत. एकंदरीत या सर्व घडामोडींमुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता मात्र वाढली आहे.
एरंडोलमध्ये सीसीटीव्ही बंद
जळगावच्या एरंडोल येथे स्ट्राँग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले अडीच तासापर्यंत बंद पडल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराबाबत एरंडोल नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप तसेच शंका उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. तर जळगावच्या धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतःच स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देताना दिसत आहेत. राज्यभर कमी अधिक प्रमाणात हिच परिस्थिती दिसत आहे.















Discussion about this post