मुंबई । राज्यातील भाजप, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मिळून महायुतीचे सरकार आहे. मात्र या सरकारमध्ये सगळं आलबेल असल्याचं दिसतेय. सरकारमधील काही नेते मित्र पक्षांमधील काही नेत्यांवर टीका करताना दिसत आहे. अशातच अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. सुनील तटकरे यांच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्या काढत त्यांनी टीका केली आहे. टीका करताना दळवी यांची जीभ घसरली.
सुनील तटकरे हे रायगड आणि महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत. त्यांचं कामच फसवणूक करणं आहे, असा घणाघाती आरोप दळवींनी तटकरेंवर केला. रोह्यातील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. ‘तटकरेंसारख्या नालायकांबरोबर जाणार नाही’ असा उल्लेख करत दळवींनी ‘महायुतीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आम्ही युती कधीही करणार नाही. आमची एकला चलोची भूमिका आहे’, असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं.
तसेच ‘भरत गोगावलेंच्या आईच्या नावावर राजकारण करणं तटकरेंना शोभत नाही. रायगडमधील जनता हे कधीही सहन करणार नाही;, असंही दळवी म्हणाले. या संपूर्ण भाषणात दळवींनी तटकरेंवर आगपाखड केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तटकरे यांची खेळी आणि शिवसेनेची रायगड जिल्ह्यात वाढलेली ताकद या विषयावर आमदार महेंद्र दळवी रोहा येथे बोलत होते. पत्रकारांसोबत सर्वकाही बोलू शकत नाही. पण जेव्हा स्फोट होईल तेंव्हा तटकरे साहेबांना वर बघावं लागेल, माझ्याकडे जादूची कांडी आहे’, असा इशाराच दळवी यांनी तटकरे यांना थेट दिला आहे.















Discussion about this post