मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्ष्यात घेऊन सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यांनतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांनी पदाचा अखेर राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची महाराष्ट्राची धुरा ही साताऱ्यातील नेत्याकडे सोपवलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विशेषत: सातारा जिल्हा शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपद देऊन मोठी राजकीय खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई बाजार समितीचं सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना छगन भुजबळांनी राष्ट्रवादीत आणलं. माथाडी कामागारांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे. शरद पवारांनी त्यांना साताऱ्यात आणलं. त्यानंतर त्यांना जावळीतून राष्ट्रवादीचं तिकीट दिलं होतं. पुढे शालिनी पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंतर कोरेगावात आणलं. त्यांची शरद पवारांवरील निष्ठा महत्वाची ठरली आहे.
Discussion about this post