जळगाव : शहरातील जय नगरात राहणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यापात्याची शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५ लाख ९५ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील जय नगरातील ओंकारेश्वर मंदिराजवळ हेमेंद्र राजेंद्र शर्मा (५६) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याशी काही महिन्यांपूर्वी राम इन्व्हेस्टमेंट नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप अॅडमिन गुरुराम या नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांना टेकस्टार कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले.
त्यासाठी गुरुराम नामक व्यक्तीने त्यांनी टेकस्टार हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार शर्मा यांनी ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या बैंक खात्यातून एकूण ५ लाख ९५ हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. मात्र, त्यानंतरही शर्मा यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी शनिवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन ही माहिती दिली. शर्मा यांच्या फिर्यादीवरून गुरुराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे















Discussion about this post