मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ लागू केली. आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असता त्यातच गॅस सिलिंडरच्या दर वाढल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केला आहे. यातच गॅस दरवाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोदी सरकारला खडे बोल सुनावलं आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया अंकाऊट एक्सवरुन मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. जनतेच्या माध्यमातून पक्षानं मोदी सरकारला पत्र लिहिलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.ही दरवाढ निमूटपणे सहन करा, असे जनतेला सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर हे पत्र शेअर करण्यात आले आहे. वाईट वाटून घेऊ नका, असा खोचक सल्ला व्हिडिओतून देण्यात आला आहे. मोदी सरकार हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
गॅस दरवाढीचा भडका उडू नये म्हणून मोदी सरकारचं देशवासियांसाठी खुलं पत्र ! pic.twitter.com/rIWfyrGZ8B
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 8, 2025
डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.
काय म्हटलं आहे या पत्रात ….
प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.”
Discussion about this post