मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयाराम सुरुच असून अशातच आता सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू पक्षाला रामराम ठोकणार आहे. सोलापूरमधील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
संजय क्षीरसागर हे उद्या २४ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: संजय क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षातून ते बाहेर पडत असल्याने हा फडणवीस यांना धक्का आहे. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.
भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सोडण्यापूर्वी मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांना पक्षात आपणास कसा त्रास दिला गेला, त्याचे पुरावे दिले, असे संजय क्षीरसागर यांनी सांगितले. संजय क्षीरसागर लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्ष सोडत असल्याने भाजपाची अडचण निर्माण होऊ शकते.
Discussion about this post