मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर ते लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, मला कुठेतरी थांबावे लागेल, असे सांगितले. मला निवडणूक लढवायची नाही आणि आता वेळ आली आहे की नव्या पिढीने पुढे यायला हवे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली व अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाला. तेव्हाही शरद पवारांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होऊ लागली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचं नमूद करत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. “तुमच्यातले काही लोक त्या वेळी हयात होते, काहींचा जन्म झाला नव्हता. ५५ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं. त्यातले काही मतदार मला अजूनही इथे दिसत आहेत. त्याला आता ५०-५५ वर्षं होऊन गेली. मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे”, असं शरद पवार म्हणाले.