मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनदरम्यान नेमकं काय बोलणं झालं हे सांगितले.
ते म्हणाले की, ‘आमच्या बैठका झाल्या आणि इंडिया आघाडीने बी सुदर्शन यांचा फॉर्मही भरला. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांचा मला काल फोन आला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने सी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले हे शक्य नाही. मी फडणवीस यांना सांगितले की राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत.’
शरद पवार यांनी पुढे असे देखील सांगितले की, ‘एनडीएकडे मतांची संख्या जास्त पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमच्याकडे मतांची संख्या कमी आहे मात्र आम्हाला चिंता नाही. राधाकृष्णन राज्यपाल असताना देखील सीएम सोरेन यांना अटक झाली होती. आम्ही सरकारचा विचार करत नाही तर निवडणूक आयोगाचा विचार करतो. निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाही. बिहार राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या आठवड्यात ३०० खासदार रस्त्यावर उतरले तेव्हा आम्हाला अटक केली.’















Discussion about this post