अमळनेर । सध्या राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी पेटलं आहे. त्यात म्हणजे वृत्तपत्रातील मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील या जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले पवार?
यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आम्हालाही हे आत्ताच कळलं की महाराष्ट्राचं भाग्य आहे की, अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज होता की, हे सरकार भाजपमुळे बनलं आहे, या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे, असे शरद पवार म्हणाले.
‘मुख्यमंत्र्याच्या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली आहे की, सरकारमध्ये भाजपचं योगदान जास्त नाही. ते अन्य घटकांचं आहे. महाराष्ट्राला कळवण्याचा ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद’, असेही शरद पवार पुढे म्हणाले.
दरम्यान, कापसाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यात कापसाच्या किमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करावे असे म्हणणारे सरकार अपयशी ठरले आहे, असे शरद पवार म्हणाले.शेतीसाठी लागणारी पैसे कापसातून येणार होते, पण सध्या याबाबतीत शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
Discussion about this post