मुंबई । अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. यातच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा आज सकाळपासून सुरु होती. बुधवारी पुण्यात शरद पवार गटाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या मंगलदास बांदल यांनी दिलेल्या माहितीमुळे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यांच्या या वक्तव्याने संभ्रम पसरला होता.
परंतु, आमचा पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत, अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
शरद पवार यांनी बुधवारी सकाळी राज्यभरातील नेते, खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे. शरद पवार साहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण राज्याला मान्य आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकांमध्ये साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला मूळ चिन्ह आणि पक्षाचे नाव दिले नाही तर आम्ही पक्षाचे नवे नाव आणि चिन्ह घेऊन लढू. आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील. तेच अस्तित्त्व घेऊन आम्ही विधानसबा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.
आम्ही दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, या चर्चेत काहीही तथ्य नाही. या बातम्या साफ चूक आहेत. आमची आजची बैठक पक्षाचे चिन्ह आणि नाव काय असू शकते, यासंदर्भात होती. पण आम्ही बॅकफूटवर आलो असा समज पसरण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा बातम्या जाणीवपूर्व पेरल्या जात आहेत, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
Discussion about this post