जळगाव : केंद्राने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयाची मोठी वाढ केली असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या गॅस दरवाढीबाबत विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात थाळीनाद करत कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात आवाज उठवला, तसेच “भीक मागो” आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदवत लक्ष वेधले.
या आंदोलनामुळे काही वेळेकरीता वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post