जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपात घरवापसी करणार आहे. यासंदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं माध्यमांना सांगितलं होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंनी घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. दरम्यान, शरद पवार हे रविवारी जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात भाष्य केले.“एकनाथ खडसे यांच्यावर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ आली असावी”, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
“एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करण्याची भूमिका याआधी महाराष्ट्रात कधीही नव्हती. मात्र, ती आता सुरु झाली आहे. त्यामधून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित ही अवस्था एकनाथ खडसे यांच्यावरदेखील आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे”, असे शरद पवार म्हणाले.
खडसेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला का?
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, ते लवकरच भाजपात जाणार आहेत. यासंदर्भाने त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले, “मला याबाबत माहिती नाही. जयंत पाटील यांना माहिती असेल. ते संघटनेचे काम पाहतात. या भागात ज्यांचा प्रभावीपणे काम करण्याचा लौकीक आहे. त्यामध्ये एकनाथ खडसेदेखील आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू”, असेही शरद पवार म्हणाले.















Discussion about this post