बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यातच धनंजय मुंडे राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्येप्रकरणी विचारणा करण्यात आली. तसेच धनंजय मुंडेंनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. या प्रकरणी शरद पवारांनी त्यांचे मत व्यक्त केले.
हे महाराष्ट्राला शोभणारं नाही
“संपूर्ण प्रकरणच चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने हत्या केली. त्यामागचे कोण लोक आहेत याची चर्चा आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मी पहिल्यांदा भेटायला मीच गेलो होतो. परभणीतही मीच पहिला गेलो होतो. लोकांची प्रतिक्रिया चीड आहे. त्या ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण होईल असं दिसत होतं. त्यामुळे यातून मार्ग काढण्याची बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. या ठिकाणी राजकारण येऊ नये आणि समाजात एक वाक्यता राहावी ही भूमिका मांडली. दुर्देवाने काही ना काही घडतंय. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. आमचा दृष्टीकोण सामंजस्य निर्माण करणारा आहे”, असे शरद पवार म्हणाले.
“माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांची घेतला पाहिजे. राज्यात चर्चा काय आहे, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याप्रकरणाची अधिक माहिती गृहखात्याकडे असली पाहिजे. वस्तुस्थिती पाहून राज्यकर्त्यांनी वातावरण निवळण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल केली.“एकाही खासदाराचं असं मत नाही. हा जावई शोध कुणी लावला माहीत नाही. राज्याच्या पक्षाच्या प्रमुखाला तुम्ही पक्ष सोडून जाणार आहात का हे विचारता काही तरी तारतम्य पाळलं पाहिजे”, असेही शरद पवार म्हणाले.
Discussion about this post