मुंबई । केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाली असून विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहे. अशातच कांदा प्रश्नावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर हल्लाबोल करतायत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कांद्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना टोला लगावला आहे.
कृषी मंत्री असताना उपस्थित राहिलेल्या कांदा प्रश्नाची आठवण शिंदेंनी पवारांना करुन दिली आहे. यावर शरद पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.मी कृषी मंत्री असताना कधी निर्यात शुल्क ४०% लावले नव्हते, अशा शब्दांत पवारांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आज लावलेले निर्यात शुल्क सरकारने रद्द करावेत. अशी भूमिका देखील शरद पवारांनी घेतली आहे.
केंद्र सरकराने कांद्याला प्रतिक्विंटलला दिलेला भाव हा उत्पादन खर्च काढणाराही नाही, असं शरद पवार म्हणाले. कांदा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. परिणामी सरकारने निर्यात शुल्क कमी करावं, असंही शरद पवार म्हणाले. केंद्र सरकारने पहिल्यांदा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदतीसाठी कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.
Discussion about this post