मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल २३ रोजी जाहीर झाला असून यात महायुतीचे तब्बल २३० आमदार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे ४६ आमदार निवडणून आले आहेत. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यानंतर यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला अवघ्या १० आमदारांवर समाधान मानावे लागलं आहे. महाविकास आघाडीच्या या पीछेहाटीनंतर शरद पवार यांनी पुढील रणनीती सांगितली आहे.
शरद पवार यांची साताऱ्यातील कराडमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी निवडणुकीनंतरचं प्लानिंग सांगितलं. शरद पवार म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. त्यानंतर आज मी कराडमध्ये आहे. या निकालानंतर एखादा घरी बसला असला असता. पण मी घरी बसणारा नाही. आमच्या तरुण पिढीला असा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. खरंतर आता त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना आता पुन्हा उभं करणे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे. नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभं करणे हा माझा कार्यक्रम राहील’.
साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘मला सोडून गेलेले पडतात, मी आधी देखील बोललो होतो. मात्र या निवडणुकीत तसं पहायला मिळालं नाही. आमच्यातून बाहेर गेलेले लोक लढले आणि निवडून आले. त्यांनी भाजप बरोबर घरोबा केला. पण यशवंत चव्हाण साहेबांनी कधी भाजपचे विचार धरले नाहीत’.
बारामतीतील निकालावर पवार काय म्हणाले?
बारामतीतील हायव्हॉल्टेज लढाईवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘युगेंद्र पवार आणि अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही. पण बारामतीत उमेदवार दिला नसता तर राज्यात काय संदेश गेला असता. आम्हाला आधीच माहिती होतं, कारण अजित पवार यांनी बारामतीत खूप काम केलं आहे’.
Discussion about this post