शहादा । अकोल्याहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना धुळ्यातील शहादा येथे घडली आहे. त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी होते. बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी साइडला लावून सर्व प्रवाशांना झोपेतून उठवून खाली उतरवले. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. मात्र तोपर्यंत लक्झरी बससह सर्व वऱ्हाडींचे सामान जळून खाक झाले होते.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील लग्नाचे वन्हाड घेऊन एमएच १२ केक्यू ४३४५ क्रमांकाची खासगी बस १५ वऱ्हाडींना घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लग्नाला जात होती. पहाटे सोनगीर ते डांगुर्णेदरम्यान बसच्या पुढील हेडलाइटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने धूर निघत असल्याचे लक्झरीचे चालक रघुनंदन तडस यांच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून गाडी साइडला उभी केली.
झोपलेल्या प्रवाशांना उठवल्याने अनर्थ टळला
रघुनंदन तडस यांनी बसमधील सर्व वन्हाडी मंडळींना साखरझोपेत असताना उठवले आणि बसखाली उतरवले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. धुळे येथील या घटनेची माहिती कंट्रोल रूमला अज्ञात कोणी तरी दिली, त्यानुसार शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दुष्यंत महाजन व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. आगीत प्रवाशांचा सर्व सामान जळून खाक झाला आहे. या घटनेची फिर्याद अद्याप शिंदखेडा पोलिसांत दिली नसल्याने नेमके किती नुकसान झाले हे कळू शकत नाही.
Discussion about this post