मुंबई । राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून याचदरम्यान आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूराजे देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चांगला चढल्याचे दिसून आलं.च्यायला.. गद्दार कोणाला बोलतो रे, तू बाहेर ये तुला दाखवतो थेट असं शंभूराजे देसाई यांनी अनिल परब यांना म्हटलं.
नेमकं काय घडलं?
मराठी मणासांना प्राधान्यानं घर मिळालं पाहिजे, हा कायदा आहे का? तर नाही. सरकारची इच्छा आहे, मराठी माणसांची इच्छा आहे, आमचं पण तेच म्हणणं आहे, कायदा झाला पाहिजे, असं अनिल परब यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, 2019 ते 2022 या काळात सरकारने असा काही निर्णय घेतला होता का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? त्यावेळी तो झाला नाही.
दरम्यान त्याचवेळी अनिल परब यांनी गद्दार हा शब्द वापरला, आणि हा वाद सुरू झाला. त्यानंतर शंभुराज देसाई चांगलेच संतापले, तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? असा सवाल त्यांनी यावेळी परब यांना केला. तसेच तू बूट चाटत होता, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान वाद वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर हे शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिल्या, त्यानंतर ते शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आले.
Discussion about this post