भुसावळ । भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय (चादर, गाद्या पुरवणारे कर्मचारी) यांना पकडण्यात आले. रविवारी कामाख्या एक्सप्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या तिकीट तपासणी मोहिमेत १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल करण्यात आले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत.
वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या पथकाने ट्रेन क्र. १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या (एलटीटी-कामाख्या) एसी एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ स्थानकादरम्यान अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात विनातिकीट प्रवाशांकडून काही लिनेन बॉय हे पैसे वसूल करीत होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हे लिनेन बॉयच तोतया असल्याचे आढळून आले. त्यांना लागलीच अटक करून भुसावळ येथील आरपीएफ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या मोहिमेचे नेतृत्व सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) भुसावळ यांनी केले. १२ फिरत्या तिकीट तपासनीस (टीटीई) व मनमाडहून आलेले पाच आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले होते.
Discussion about this post