मुंबई । सप्टेंबरच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सिलिंडरच्या किमतीत ५१.५० रुपयांपर्यंत कपात केली आहे. तथापि, यावेळी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत. आजपासून नवीन दर लागू झाले असून मात्र दुसरीकडे घरगुती १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, ऑईल कंपन्याकडून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती ठरवल्या जातात. त्यानुसार आज व्यावसायिक सिलिंडरची किंमत ५१.५० रूपयांनी स्वस्त झाली आहे, यानंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६३१.५० रुपयांवरून १५८० रुपयांवर आली आहे. याशिवाय, कोलकातामध्ये ते १७३४.५० रुपयांना मिळत होते, जे आता १६८४ रुपयांना मिळेल. मुंबईतही त्याची किंमत १५८२.५० रुपयांवरून १५३१.५० रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत १७८९ रुपयांवरून १७३८ रुपयांवर आली आहे.
१९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्याचा फायदा हॉटेल, रेस्टारंट, ढाबा आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे.याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑईल मार्केटिंग कंपन्यानी गॅसच्या किंमतीत ३३.५० रूपयांनी कपात केली होती. तर १ जुलै रोजी सिलिंडरची किंमत ५८ रूपयांनी कपात केली होती. व्यावसायिक गॅसच्या किंमती सातत्याने कमी होत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील चार ते पाच महिन्यापासून गॅसच्या किंमती जैसे थे आहेत.















Discussion about this post