जळगाव । जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहेत. हा निर्णय सीबीएससी शाळा वगळता सर्व इंगजी माध्यमाच्या शाळांसाठीही लागू असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिक होत चालली आहे. जिल्ह्यात तापमान ३८ अंशाच्या वर गेल्याने उष्णता जाणवत आहे. शालेय विद्यार्थ्यांना या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातीलशाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील, मात्र माध्यमिक शाळा संहिता नियम ५४.२ नुसार शिकवण्याचे तास कमी करता येणार नाहीत. दररोज किमान चार तास प्रत्यक्ष अध्यापन होणे अनिवार्य आहे, जेणेकरून आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) २००९ च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्या शाळा आधीच दोन सत्रांमध्ये सुरू आहेत, त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार असून सकाळी लवकर शाळा सुटल्याने पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केला आहे.















Discussion about this post