मुंबई : राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी मतदानाच्या अगोदर २ दिवस १८, १९ नोव्हेंबरला सुट्टी असल्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकामुळे संभ्रम निर्माण झाला होता, मात्र यावर शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसेल तरच या शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी असे स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील सर्वच शाळांना १८, १९ नोव्हेंबरला सुट्टी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे राज्यात चार दिवस शाळांना सुट्टी असल्याचा संस्थाचालकांत संभ्रम निर्माण झाला; मात्र याबाबत आयुक्त कार्यालयाकडून स्पष्टीकरण नसल्याने राज्यभरात सुट्टीचा गोंधळ दिसून आला. हा गोंधळ दूर करताना राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. मतदानाच्या २ दिवस आधी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नसून ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असेल अशा शाळांबाबत शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातही शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसेल तरच या शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना असल्याचे मांढरे यांनी नमूद केले आहे
मुख्याध्यापकांना सुट्टीचे अधिकार
१८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. शासनाने या संदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. १८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.