मुंबई । नवीन शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील स्कूल बसेससाठी नवीन सुरक्षा नियम लागू होणार आहेत. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यात या संदर्भातील अहवाल सादर करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
खरंतर राज्यातील विविध शाळा आणि खाजगी बस ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धतीबाबत पालकांकडून मोठ्या संख्येने तक्रारी आल्याने महाराष्ट्र परिवहन विभागाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेससाठी नवीन नियमावली तयार केली जाईल. तसेच, पालकांकडून वाहतूक शुल्क आकारणाऱ्या संस्था किंवा स्कूल बस ऑपरेटरनी बसेसचे केंद्रीकृत सीसीटीव्ही निरीक्षण अनिवार्यपणे करावे.” असे ते म्हणाले.
नवीन नियमांत काय असेल?
1. सुरक्षा यंत्रणा : प्रत्येक स्कूल बसमध्ये खालील सुविधा असणे अनिवार्य असेल :
पॅनिक बटन – आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी.
अग्निशमन स्प्रिंकलर – आग लागल्यास त्वरित नियंत्रणासाठी.
जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम – बसचे थेट लोकेशन पाहण्यासाठी.
सीसीटीव्ही कॅमेरे – विद्यार्थी आणि बस स्टाफच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी.
2. केंद्रीकृत सीसीटीव्ही निरीक्षण प्रणाली :
ज्या शाळा किंवा बस ऑपरेटर पालकांकडून वाहतूक शुल्क आकारतात, त्यांच्यासाठी ही प्रणाली बंधनकारक असेल. या प्रणालीद्वारे बसच्या हालचाली आणि आतील घडामोडींवर सतत देखरेख ठेवली जाईल.
3. नियमांचे पालन न केल्यास कारवाई :
या सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बस ऑपरेटरचा परवाना रद्द केला जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post