सावदा : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. यातच सावदा शहरातील स्वामीनारायण नगरात तीन ठिकाणी मध्यरात्री घरफोड्या केल्या. शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्यामुळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील कोळंबे गुरुजी (हल्ली मुक्काम पुणे) यांच्या घराचे कुलूप कापून सुमारे 18 हजार रुपये तसेच चांदीचे शिक्के लांबवण्यात आली तर त्यांच्या शेजारील भांडे व्यापारी अजय भागवत कासार (34, स्वामी नारायण नगर, पाण्याच्या टाकीजवळ) यांच्या घराची मागची खिडकीची ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. गोदरेजचे कपाटाचे लॉकर तोडून दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सहा तोळे वजनाच्या बांगड्या, एक लाख 60 हजार रुपये किंमतीची चार तोळे वजनाची पोत, 40 हजार रुपये किंमतीची व 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 20 हजार रुपये किंमतीची व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण चार लाख 60 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.
त्यानंतर जवळच विकी भिडे यांच्या केला ग्रुपमधून सुद्धा 50 ते 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांनी घटनास्थळी भेट दिली व तत्काळ फिंगर प्रिंट एक्स्पर्ट व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तपास सुनील कुरकुरे, प्रकाश जोशी, संजय देवरे व सहकारी करीत आहे.
Discussion about this post