जळगाव : पाचोरा शहरातील नामांकीत सराफ दुकानात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पाचोरा शहरात पाटील ज्वेलर्स या सराफा दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात रविवार (दि.2) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून डीव्हीआर आणि 68,000 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी चोरट्यांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तपास पथक स्थापन करुन चोरट्यांचा मागोवा घेतला. पाचोरा पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड यांना घटनास्थळी बोलावून तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटे एका सफेद बोलेरो वाहनाने आले आणि पसार झाल्याचे दिसून आले. चोरट सराईत गुन्हेगार असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान, शुक्रवार (दि.7) रोजी धरणगाव मध्ये एक बोलेरो वाहन चोरीस गेल्याची नोंद झाल्याचे माहिती पोलीसांना मिळाली. तपासादरम्यान, रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवार (दि.7) रोजी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याचा तपास सुरू झाला. पोलीसांनी शनिवार (दि.8) ८ फेब्रुवारी रोजी रणजितसिंगला राजीव गांधी नगर, जळगाव येथून अटक केली. यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो (क्रमांक MH-19-AX-7098) जप्त करण्यात आली. अटकेनंतर चौकशीत आरोपीने कबुली दिली आहे की, त्याने मंगळवार (दि.4) रोजी खामगाव, बुलढाणा येथे चोरट्यांनी एटीएम देखील फोडण्याचा प्रयत्न केला होता.
रणजितसिंगच्या चौकशीत त्याच्या अन्य तीन साथीदारांची नावे उघड झाली आहे. भगुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जुन्नी (रा. जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवद, परभणी), शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा. बोंड, परभणी) या तिघांनी मिळून पाचोरा ज्वेलर्स चोरी केली आणि मुद्देमाल जळगावमधील एका सोनाराच्या दुकानात गहाण ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी हे सोने-चांदीचे दागिने (67,081 रुपये) जप्त केले आहेत.
रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला एम पी डी ए लावण्यात आलेला असतानाही जामीन झाल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यात सुरुवात केली. तो सराईत गुन्हेगार असून अनेक जिल्ह्यांमध्ये चोऱ्या केलेल्या असल्याने त्याच्यावर संघटित गुन्हेगारी टोळी नवीन कायद्यांतर्गत वाढीव कलम लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी यांनी दिली. त्याच्यावर यापूर्वी तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मलकापूर, रामानंद नगर, जिल्हापेठ, शनिपेठ, एरंडोल आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडी, दरोडे, शस्त्रास्त्र कायद्याचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
Discussion about this post