जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरी हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली असून यामुळे संतोष चौधरी नाराज असून त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. येत्या 24 तारखेला ते लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने संतोष चौधरी हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. जयंत पाटील यांनी आज जळगावमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. दरम्यान, शरद पवार हे उद्या रावेर लोकसभेच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यापूर्वीच जयंत पाटलांकडून रावेर लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. संतोष चौधरी यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. यापुढेही ते पवार साहेबांच्या लढ्यात त्यांना साथ देतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.















Discussion about this post