मुंबई । ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या या पुस्तकात केला आहे
गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात मोठा खुलासा केला आहे. गुजरातमधून तडीपार झालेल्या शाहांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दोनदा प्रयत्न केले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना बाळासाहेबांशी बोलता आले. शाहांनी हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीशी फोनवरून संवाद साधत शाहांच्या अडचणी दूर केल्या. “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण हिंदू असल्याचे विसरू नका,” असे बाळासाहेबांचे शेवटचे वाक्य होते, असे राऊत लिहितात.
राऊतांच्या मते, गुजरात दंगलीप्रकरणी मोदींना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, शरद पवारांनी कॅबिनेट बैठकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे अयोग्य असल्याचे मत मांडले. याला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दिल्याने मोदींची अटक टळली. त्याचप्रमाणे, अमित शाह यांच्यावर खूनप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र कॅडरच्या एका सीबीआय अधिकाऱ्याशी संपर्क साधून शाहांना मदत केल्याचा दावा राऊतांनी केला.
गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याचे अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले. “मी अडचणीत आहे, अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपारी आहे वगैरे…” असे अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर अमित शाह बाळासाहेब यांना म्हणाले.” आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे…तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत” त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी संबंधित व्यक्तीला थेट फोन केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे अमित शाह यांना म्हणाले की, “तुम्ही कोणतेही पदावर बसलेले असा पण तुम्ही ही हिंदू आहात हे विसरू नका.” पण त्यानंतर अमित शाहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्यांनी पाहिलं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी ते निर्घृणपणे वागल्याचे या पुस्तकातून संजय राऊत यांनी सांगितलेय.
Discussion about this post