उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मात्र यामुळे ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे दिसतेय. यातच संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांनी राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केलाय, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केली. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील दुरावा दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Discussion about this post