मुंबई । राज्यसभेसाठी महाराष्ट्राच्या ७ जागांपैकी महाविकास आघाडीच्या एका जागेवर कोणाला पाठवायचे, यावर सत्तापक्षातील तीनही घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकमत साधून निर्णय घेण्याची तयारी आहे. यातच शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही मोठे दावे केले.
आदित्य ठाकरे यांनी रोटेशनचा मुद्दा पुढे करत यावेळी राज्यसभेवर शिवसेनेचा खासदार असेल असे विधान केले. तर त्यासाठी शिवसेनेकडे संख्याबळ असल्याचाही दावा केला. त्यामुळे राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव मागे पडून उद्धव सेनेकडून नाव समोर येणार का याची चर्चा सुरू झाली. त्यावर संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले की आधी निर्णय तर होऊ द्या. महाविकास आघाडीची राज्यसभेसाठी एकच जागा आहे. तेवढे संख्याबळ आमच्याकडे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे हे तीन पक्ष बसून ठरवतील. अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे, आदित्य ठाकरे जे बोलले ते योग्य आहे असे संजय राऊत म्हणाले. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते राज्यसभेतून निवृ्त्त होत आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तीन पक्षांनाच मिळून निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यामुळे त्याच्यावर आता बोलणे निरर्थक असल्याचे राऊत म्हणाले.















Discussion about this post