जळगाव । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. “वादळ, पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं? व्यवस्थित अभ्यास करून फाईल तयार केलेली आहे. ज्या ईडीला घाबरून तुम्ही तिकडे पळाले, असं सांगतात. तीच इडी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना जेलमध्ये टाकण्याचा इशाराही जाहीर भाषणातून दिला. ज्या जागा शिवसेनेच्या होत्या त्या आपण लढायलाच हव्या आणि जिंकायला हव्या. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केलेला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या चरणी गहाण टाकला आहे. तुम्हाला मंत्री म्हणून रोजगार मिळाला. तुमच्याकडे पाणी खात आहे, पाण्यासारखा पैसा आहे. डांबर, माती, वाळू अशा सर्व ठिकाणाहून तुम्ही पैसे खात आहात, असा आरोप संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केला.
लोकसभेचा निकाल काय लागला ते विसरून जा. या जिल्ह्यामध्ये लोकसभेत भाजपचे जवळपास दोन लाख मतं कमी करण्याचे काम आपण केलं आहे. ज्या जळगाव जिल्ह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या जागा शिवसेना जिंकणार, असंही राऊत म्हणाले.















Discussion about this post