जळगाव । स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी केला. यांनतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज सायंकाळी आदेश काढून संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविले. तर त्यांचा प्रभार हा जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे राहूल गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकाराची माहिती दिली. आमदाराकडे तक्रार करण्यासाठी गेल्यास त्यांनाही बंदुकीची गोळी मारण्याची धमकी निरीक्षक देत असल्याचे चव्हाण यांनी नियोजन समितीच्या निदर्शनास आणून दिले.
त्याच प्रमाणे संबंधित निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेतून तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. प्रत्यक्षात, संबंधित वादग्रस्त निरीक्षकाची शुक्रवारी सायंकाळी तातडीने उचलबांगडी करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढल्याचे सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या वादग्रस्त निरीक्षकावरील कायदेशीर कारवाई संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याशी संर्पक साधला असता, त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.















Discussion about this post