मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते. शिवसेनेत फूट पडली, तेव्हाही त्यांनी ठाकरे गटामध्येच कायम राहून त्यांनी आपले काम सुरु ठेवले. मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते.
अखेर व्यथित होऊन थरवळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर काल संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
Discussion about this post