मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसदेचे थाटामाटात उद्घाटन झाले. यावेळी मोदी सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनात पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरु करण्यात आलं. मात्र विरोधकांनी यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.
काय आहे सामना अग्रलेख…
राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्ष त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक ‘संसद भवनाला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. 20 तारखेला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते.
जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते. लोकसभेसाठी इतर ‘दोन’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते.
आणखी किमान 50 ते 100 वर्षे मजबुतीने उभे राहील असे संसद भवन असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टहास कशासाठी? दिल्लीतील वर्तुळात यावर ज्या चर्चा सुरू आहेत त्या मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह, कुंडलीचा पगडा आहे. “सध्याचे संसद भवन दहा वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही असं म्हणत जोरदार टीका करण्यात आली आहे.
Discussion about this post