नागपूर । देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचं सरकार स्थापन झालं असून रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना खाते वाटपही जाहीर झालं. आता निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरच्या मुद्द्यासह व विविध विषयावर प्रतिक्रिया दिली.
मोहन भागवत सोमवारी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समापन समारंभ’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीत संघाला ओढणं, निवडणूक मर्यादा, मणिपूरमधील अशांतता, दुसऱ्यांच्या मताचा सन्मान अशा मुद्यांवर मोकळेपणाने सरसंघाचालक मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले.
RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल आलेत. सरकार सुद्धा बनलं आहे. जे झालं, ते का झालं? कसं झालं? हे लोकशाहीचे नियम आहेत. समाजाने आपल मत दिलय. संघाचे लोक यामध्ये पडत नाही. आम्ही निवडणुकीत परिश्रम करतो. जे सेवा करतात, मर्यादेने चालतात, सगळे लोक काम करतात. पण कुशलता लक्षात घेतली पाहिजे. मर्यादा आपला धर्म आणि संस्कृती आहे”
‘निवडणूक लढताना एक मर्यादा असते’
“सहमती व्हावी यासाठी संसद आहे. स्पर्धेमुळे यात अडचणी येतात. म्हणून बहुमताबद्दल बोलल जातं. निवडणुकीत संघासारख्या संघटनेला ओढण्यात आलं. बरच काही बोललं गेलं. टेक्नोलॉजीचा आधार घेऊन असं केलं गेलं. विद्येचा उपयोग प्रबोधनासाठी असतो. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर केला गेला. निवडणूक लढताना एक मर्यादा असते” असं सरसंघाचालक मोहन भागवत म्हणाले.
NDA सरकारबद्दल काय म्हणाले?
“सरकार बनलय. पुन्हा NDA च सरकार आलय. मागच्या 10 वर्षात बरच काही चांगलं झालय. जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढली आहे. विज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात आपण पुढे जातोय. पण म्हणून आव्हान संपली असं नाहीय. आपल्याला आता अन्य समस्यांमधून बाहेर पडायचं आहे” असं मोहन भागवत म्हणाले.















Discussion about this post