धुळे । धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात एक दुर्दैवी घटना घडलीय. ज्यात सततच्या पावसामुळे एका घराचे छत अचानक कोसळले. या घटने छताच्या खाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले पती आणि नातू हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत सुपाबाई तात्या चव्हाण (वय ६३) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. दरम्यान धुळे शहर व जिल्ह्यातील अनेक भागात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास देखील पाऊस सुरूच होता. यामुळे जुने असलेल्या घराचे छत पावसामुळे अचानकपणे कोसळले. यावेळी घरात परिवार झोपलेला होता.
रात्रीच्या सुमारास घरात वृद्ध पती- पत्नी आणि त्यांचा नातू झोपलेले होते. तिघेजण गाढ झोपेत असताना संततधार पावसामुळे घराचे छत अंगावर पडल्यामुळे आजी- आजोबा आणि नातू असे तिघेजण छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात वृद्ध महिलेचा छताखाली दाबून जागीच मृत्यू झाला. तर आजोबा व नातू हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जवळपास रात्री दीड वाजेच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. गाव झोपलेले असताना अचानकपणे रात्री मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बचावकार्य करत आजीचा मृतदेह ढीगाऱ्या खालून काढला. तर वृद्ध इसम व चिमुकल्याला ढीगाऱ्याखालून काढत त्यांचा जीव वाचविला आहे.
Discussion about this post