सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपणार आहे. आता शेवटच्या सामन्याचा निकाल काहीही लागो, पण दरम्यानच्या काळात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कसोटी कारकिर्दीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याला शेवटच्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.
अशातच रोहितने जर नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रतिभावान आणि फॉर्मात असलेला युवा खेळाडू शुभमन गिल संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
पदलालित्याच्या समस्या आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
रोहित शर्मा सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पाचपैकी सुरुवातीच्या कसोटी सामन्यात तो दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या पाच डावांत त्याची सर्वोत्तम धावसंख्या अवघी १० धावा आहे. शास्त्रींच्या मते, रोहित आतापर्यंत मालिकेत पदलालित्याशी झुंजत असून चेंडू थोडा उशिराने खेळत आहे.
गौतम गंभीर यांच्यानंतर शास्त्री यांचं विधान
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत संघाच्या कर्णधाराच्या स्थानाबाबत कोणतीही स्पष्टता न दिल्याने, सिडनी कसोटीसाठी रोहितच्या अंतिम अकरा मधील स्थानाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता शास्त्री यांचे हे विधान आले आहे.
Discussion about this post