मुंबई : अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली असून विमान कंपनीलाही त्यांनी धारेवर धरले आहे. आता या प्रकरणात रोहित पवार यांनी थेट ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, २७ जानेवारी रोजी अजितदादा पवार हे बारामतीला रस्ते मार्गाने जाण्याच्या तयारीत होते. मात्र मंत्रालयातील काही कामांमुळे त्यांना उशीर झाला. विशेषत: एका राईस मिल संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी अचानक हालचाल झाली. त्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. फाईल मंत्रालयातून मागवून त्यावर सही होईपर्यंत बराच वेळ गेला आणि त्यामुळे नियोजित रस्ते प्रवास रद्द करावा लागला.
त्यामुळे २७ तारखेला रात्री सुमारे ७.३० वाजता दुसऱ्या दिवसाच्या विमान प्रवासाचे बुकिंग करण्यात आले. जर विमान प्रवासाचा निर्णय आधीपासून ठरलेला असता, तर बुकिंग २६ किंवा २७ तारखेच्या दुपारपर्यंत झाले असते, असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
तसेच एका मोठ्या नेत्याचा फोन, पॉलिटिकल कन्सल्टंटच्या कोट्यवधी रुपयांच्या करारावरील वाद आणि अचानक आलेली फाईल या सर्व घटनांचा २७ व २८ जानेवारीच्या घटनाक्रमासह सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पायलटने मागील काही महिन्यांत कोणाला भेटले होते, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या आरोपांवर प्रफुल्ल पटेल काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार असल्याचेही सांगितले आहे.















Discussion about this post