जळगाव- राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन राज्य सरकार महिलांची सुरक्षितता करण्यास कमी पडत आहे उरण, शिळ फाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे याच्या निषेधार्थ आणि उरण, शिळ फाटा अत्याचाराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात जळगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगराध्यक्ष मंगला ताई पाटिल उपस्थित होत्या यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना मन विषण्ण करणाऱ्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत प्रगतशील महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत या सर्वांची मान शरमेने खाली झुकवणाऱ्या आणि अशा नराधमांवर कायद्याचा आणि गृह खात्याचा धाक राहिला नसल्याचे दर्शविणाऱ्या आहेत
नवी मुंबईतील उरण येथील एका बाविस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे. तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथिल गणेश घोळ मंदिरात गेली या दोन्ही घटना अत्यंत अमानवीय आणि निर्दयी आहे या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असल्याचे आणि महिलांची सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही घटना क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. महिला अत्याचाराच्या या घटनाची केस जलद गती न्यायालयात चालवाव्या त्यासाठी सरकारने अनुभवी वकील नेमावा व पिडीत कुटुंबाला सरंक्षण तसेच आर्थिक सहाय्य द्यावे व विकृत मानसिकतेच्या पाषाण हृदयी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
माणूस रानटी अवस्थेतून संगणक युगात आला माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा टप्पा गाठल्याच्या गप्पा मारल्या जातात परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव कायम असून स्वभावातील रानटी पणा विकृत होत असल्याचे या घटना मधून जाणवते. या विकृत आणि मुजोर मानसिकतेला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काठोरातील कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया माता भगिनी आहेत आणि माता भगिनींचा सन्मान करण्याबद्दल मुलांना शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे स्त्रियांवरील अत्याचार समाजात ज्या पद्धतीनेन पहिले जातात, त्यावर सामाजिक भूमिका बदलायला हवी. अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांची भूमिका कणखर होणे आवश्यक आहेच; पण शिवाय याविरुद्ध काय पाऊल उचलता येईल, कायदा काय म्हणतो आणि मदत कुठे मागता येईल, याविषयी समाजजागृती करणे आवश्यक आहे. अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. अशावेळी तिला मानसिक आणि भावनिक आधार देणे आवश्यक आहे. शिवाय तिचे योग्यप्रकारे सामाजिक पुनर्वसन करणेही गरजेचे आहे.असे रोहिणी खडसे यांनी सांगितले महिलांवरील या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व अशा घटना परत घडू नये यासाठी कठोर कायदा करण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी समाजातील सर्व महिलांनी आणि सर्व पक्षातील महिला नेत्यांनी एकत्रित येण्याचे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले